---Advertisement---
भुसावळ, प्रतिनिधी : घरातून दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीवरून केलेल्या तपासणीत पोलिसांना एका पशु अधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. रतनलाल छोटूराम भगुरे (वय ४८) असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रानुसार, भगुरे हे यावल तालुक्यातील पाडळसा येथे कार्यरत होते. भगुरे हे मूळचे परभणीच्या सेलू येथील रहिवाशी असून, ते यावलच्या पांडुरंग सराफ नगरमधील आत्माराम गुरूजी यांच्या घरात एकटेच राहत होते.
दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांपासून ते कोणालाच दिसून आले नव्हते, त्यांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटली. यामुळे शेजारील रहिवाशांना संशय आला. त्यांनी या संदर्भात यावल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घर उघडून पाहिले असता, पशुअधिकारी भगुरे हे मृत अवस्थेत आढळून आले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? या बाबत अनेक तर्क वितर्क मांडले जात आहेत. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
---Advertisement---