Dagdi Bank : अन्यथा…, आमदार खडसेंचा चेअरमन संजय पवारांना इशारा

---Advertisement---

 

Dagdi Bank : जळगाव : दगडी बँकेशी लाखो शेतकऱ्यांच्या आणि खातेदारांच्या भावना जोडलेल्या आहेत. बँकेला सध्या ही मालमत्ता विकण्याची कोणतीही आर्थिक निकड नाही. जर एनपीए कमी करायचा असेल, तर धरणगाव तालुक्यातील बेकायदेशीर केळी लागवड न करता काढलेले कर्ज तातडीने वसूल करण्यावर चेअरमन यांनी लक्ष केंद्रित करावे. तसेच दगडी बँक विक्रीचा हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा, शेतकऱ्यांना सोबत घेऊन ‌‘दगडी बँक बचाव‌’ ही मोहीम तीव्र स्वरूपात हाती घ्यावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकाद्वारे चेअरमन संजय पवार यांना दिला आहे.

दगडी बँक विक्रीवरून जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार आणि ज्येष्ठ संचालक आमदार एकनाथ खडसे यांच्यात सध्या शीतयुध्द रंगले आहे. आमदार खडसे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी जिल्हा बँकेत पत्रकारांशी बोलतांना मधुकर सहकारी साखर कारखाना, जे.टी.महाजन सहकारी सूतगिरणी, रावेर सहकारी साखर कारखाना, बेलगंगा सहकारी साखर कारखाना या संस्था जिल्हा बँकेने विक्रीस काढल्या तेव्हा या संस्थांशी शेतकऱ्यांच्या भावना जोडलेल्या नव्हत्या का? असा प्रती सवाल केला. तेव्हा आ. खडसेंनी विरोध का केला नाही ? असा प्रश्न उपस्थित केला. परंतु प्रत्यक्षात या कारखान्यांवर जिल्हा बँकेचे कर्ज होते. ते कर्ज वसूल होत नसल्याने वरील संस्था विक्री करणे क्रमप्राप्त होते.

जिल्हा बँकेने विक्री काढलेली दगडी बँकेची इमारत ही बँकेची स्वतःची मालमत्ता आहे. शेजारील जागेच्या दरानुसार या मालमत्तेची किंमत किमान 65 कोटी इतकी असू शकते. त्या इमारतीवर कुणाचे कर्ज नाही, एवढेही अध्यक्ष संजय पवार यांना कळत नसावे का हा प्रश्न आहे ? पूर्वजांनी कमावलेली मालमत्ता आवश्यकता नसतांना विक्रीचा अधिकार संचालक मंडळाला कुणी दिला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारने जिल्हा बँकेतील 220 कर्मचाऱ्यांची भरती करण्यास परवानगी दिली. भरती केवळ मेरिटनुसार (गुणवत्तेनुसार) झाली पाहिजे. यात कोणत्याही प्रकारची शिफारस किंवा वशिलेबाजी खपवून घेतली जाणार नाही.

सचिवांनकडून पैशांची मागणी


सचिवांकडून काही लोक 20,000 रुपये मागत असल्याची तक्रार आली आहे. बँकेच्या कारभारात गैरव्यवहार करणाऱ्या अशा लोकांवर तातडीने कठोर कारवाई करावी. जिल्हा बँकेचा कारभार चांगला चालावा यासाठी आमचे सहकार्य राहील, पण गैरव्यवहार आणि ऐतिहासिक मालमत्ता विक्रीचे चुकीचे निर्णय त्वरित मागे घेण्यात यावेत.

दगडी बँक ही केवळ इमारत नसून, ती बँकेची ओळख आणि वारसा आहे. पहिल्या चेअरमनपासून सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याच वास्तूतून बँकेचा कारभार चालवला असल्याचे आ. खडसे यांनी पत्रकात नमूद केले आहे. दरम्यान ‌‘दगडी बँक‌’ विक्रीचा निर्णय रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---