---Advertisement---
जामनेर : तालुक्यातील हिवरखेडा गावात घडलेल्या एका संशयास्पद मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रदीप कडू चांदणे (45) यांचा मृतदेह सकाळी आढळून आला. या घटनेमुळे कुटुंबिय व ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली असून, हा घातपात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, काल रात्री प्रदीप चांदणे यांना दोन जण सोबत घेऊन गेले होते. मात्र, रात्री ११ वाजता ते दोघे पुन्हा विचारपूस करण्यासाठी आले, त्यानंतर रात्री १२ वाजता मोबाईल आणून दिला. दरम्यान, सकाळी अचानक प्रदीप चांदणे मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्रदीप चांदणे यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा घातपात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, यात चार संशयितांचा सहभाग असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मयत प्रदीप चांदणे हे अनेक वर्षांपासून हिवरखेडा येथे स्थायिक होते. त्यांच्या मागे पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. कुटुंब व गावकऱ्यांनुसार त्यांचे कुणाशीही वैर नव्हते. त्यामुळे हा मृत्यू नेमका अपघात की नियोजित कट यावर आता तपासाचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र या घटनेने हिवरखेडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चार संशयितांची ओळख पटली
जामनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर कासार यांनी सांगितले की, ही घटना अपघात आहे की हत्या? याचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, चार संशयितांची ओळख पटली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती कासार यांनी दिली.
---Advertisement---