---Advertisement---
जळगाव : कोरोनाचं संकट मावळत नाही तोच आता गोवरचा उद्रेक होत असल्याचे समोर येत आहे. धरणगावच्या आश्रमशाळेतील 15 हून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अलीकडेच गोवरचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा WHO ने दिला असून, त्याची सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभिमीवर गोवरची लक्षणे काय आहेत हे जाणून घेऊयात.
धरणगाव तालुक्यात डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत हद्दीतील खाज्याजी नाईक मुलांच्या निवासी आश्रमशाळेत गोवरचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. एकूण 15 हून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
विद्यार्थ्यांना त्रास जाणवल्याने त्यांची धरणगाव ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यावेळी गोवरची लक्षणे आढळून आल्यानंतर तातडीने सर्व रुग्ण विद्यार्थ्यांना आयसोलेट करून उपचार सुरू करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी रुग्णालयात हजर राहून डॉक्टरांशी चर्चा केली व प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचे सूचित केले.
आरोग्य विभागानेही युद्धपातळीवर तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना काही दिवसापूर्वीच गोवरची लस देण्यात आली होती. लस दिल्यानंतर काही रुग्णांमध्ये लक्षणे दिसतात, हा तसाच प्रकार असून सर्व विद्यार्थ्यांचे प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय चव्हाण यांनी दिली आहे.
काय आहेत लक्षणे ?
मुलांना गोवरची लागण झाल्याचं सुरुवातीला सर्दी – ताप, खोकला, घसा दुखणं, अंग दुखणं, डोळ्यांची जळजळ होणं, डोळे लाल होणं, अशी लक्षणं दिसून येतात. त्यानंतर 5 ते 7 दिवसांत शरीरावर लालसर पुरळ येतं. कधीकधी तोंडातही पांढरे डाग दिसतात, जर असे लक्षणे दिसून आल्यास तात्काळ डॉक्टरांची संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









