---Advertisement---
धुळे : शहरात सुरत-बायपास महामार्गावर कारमधून एम.डी. ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी धुळे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने अज्जू उर्फ अजमल गांजावाला या प्रमुख संशयिताला अटक केली आहे. यामुळे या ड्रग्ज तस्करी प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता तीन झाली आहे.
पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून मालेगाव येथील अज्जू गांजावाला उर्फ शेख अजमल शेख इस्माईल (वय ४३) याचा शोध सुरू केला होता. संशयित अजमल शेख हा मोठा गांजा तस्कर म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
जळगाव येथील एका संशयिताच्या मदतीने अजमल शेख हा एमडी ड्रग्ज तस्करीच्या जाळ्यात उतरला होता. तस्करीसाठी त्याने सय्यद आतिक सय्यद रफिक याला हाताशी घेतले होते. आतिक सय्यद रफिक (वय ३७, रा. मालेगाव) आणि मजहर खान युसूफ खान (वय ३३, रा. राजस्थान) यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.
आता मुख्य संशयित अजमल शेख उर्फ अज्जू गांजावाला याला अटक केल्याने या साखळीतील पुढील माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्याची रवानगी पोलिस कोठडीत झाली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील इतर संशयितांची नावे आणि या तस्करीच्या नेटवर्कची संपूर्ण माहिती मिळतील.