---Advertisement---
भुसावळ : तालुक्यातील अंजनसोंडा व फुलगाव येथील शेतकरी प्रशिक्षणासाठी पाल येथे निघाले. दरम्यान, पालघाट परिसरात त्यांची क्लुझर गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात एक शेतकरी ठार, तर दहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहन क्रमांक MH 19 CF 3920 ही क्लुझर गाडी अंजनसोंडा व फुलगाव येथून शेतकऱ्यांना घेऊन प्रशिक्षणासाठी निघाली होती. मात्र, पालघाट भागात गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी उलटून गंभीर अपघात झाला.
या दुर्घटनेत विजय धर्मा राणे (वय ४१, रा. अंजनसोंडा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, इतर दहा शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने श्री हरि मल्टि स्पेशालिस्ट हॉस्पिटल, भुसावळ (जळगाव रोड) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, हतनूरचे उपसरपंच व भाजपा तालुका उपाध्यक्ष सचिन इंगळे तसेच अंजनसोंड्याचे सरपंच रामराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले.
जखमींचे नाव
फुलगाव (ता. भुसावळ) विमल चौधरी (वय ५१),प्रशांत चौधरी (वय ४९)राजेंद्र चौधरी (वय ६२),अंजनसोंडा (ता. भुसावळ)पदमाकर पाटील (वय ६२),डिंगबर चौधरी (वय ६९), गोपाळ कोळी (वय ७१),प्रभाकर कोळी (वय ४३),जगन्नाथ कोळी (वय ६८),इंदूबाई पाचपांडे (वय ७०),गणेश चौधरी (वय ६४), उज्वाला पाटील (३६ ) असे जखमींचे नाव आहेत.