---Advertisement---
धुळे : तडीपार करण्यात आलेल्या गुंडांवर स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. तडीपार असूनही प्रतिबंधीत हद्दीत आढळलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून १७ रोजी त्यांच्याविरुध्द शिरपूर आणि साक्री पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील बापू मरासाळे (वय २३) याला साक्री तालुक्यातील दिघावे गावातून अटक करण्यात आली, तर गोपाल रमेश चौधरी (वय २१) याला शिरपूर परिसरातून अटक करण्यात आली. हे दोघेही तडीपारीचे आदेश झुगारून आपल्या घरी परतले असताना, पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.
हॉटेलचालकाकडे खंडणीची मागणी
धुळे : शहरातील देवपूर परिसरातील एका हॉटेलचालकाला दर महिन्याला दोन हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या संशयिताविरुध्द शुक्रवारी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हॉटेलचे मॅनेजर राजेंद्र माधवराव बागूल (वय ५५, रा. बडगुजर प्लॉट, ऐंशी फुटी रोड, धुळे) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल दिली आहे. त्यानुसार, ७ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संशयित आरोपी विरेंद्र चंद्रभान अहिरे (वय ३५, रा. परिमर कॉलनी, देवपूर, धुळे) याने देवपूर भागातील ‘हॉटेल तेजस्विनी’ येथे येऊन मॅनेजर बागूल यांना धमकावले.
आरोपीने त्यांना हॉटेल सुरू ठेवायचे असेल, तर दर महिन्याला दोन हजार रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी मागणी केली. खंडणी देण्यास नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. संशयिताने हॉटेलमधील काही बाकडे फेकून दिले. याप्रकरणी हॉटेल मॅनेजर राजेंद्र बागूल यांच्या तक्रारीवरून देवपूर पोलिस ठाण्यात खंडणीखोराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.