---Advertisement---
जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद येथे प्लॉट खरेदीमध्ये ७० जणांची दोन कोटी ९१ लाख रुपयांमध्ये फसवणूक करणारे जामनेर येथील माजी नगरसेवक अनिलकुमार हिरालाल बोहरा यांचा आर्थिक गुन्हे शाखेकडून शोध घेतला जात आहे. यासाठी पथक त्यांच्या घरीदेखील जाऊन आले. दरम्यान, फसवणूक झालेल्या काही जणांचा पथकाने जबाबदेखील घेतला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जामनेरचे माजी नगरसेवक अनिलकुमार हिरालाल बोहरा (रा. आनंदनगर, जामनेर) यांनी वाकोद येथील शेती एनए झाल्याचे सांगून प्लॉट खरेदीसाठी पंढरी ऊर्फ संजय गणपत चौधरी (रा. वाकोद, ता. जामनेर) यांच्याशी व्यवहार केला. या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
व्यवहारापोटी सात लाख ५० हजार रुपये रोख व दोन लाख ५० हजार रुपयांचा धनादेश बोहरा यांनी घेतला व एका महिन्याच्या आत प्लॉट खरेदी करून देण्याचे सांगितले, मात्र नंतर खरेदी करून दिली नाही. अशाच प्रकारे बोहरा यांनी वाकोद येथील ७० जणांची एकूण दोन कोटी २१ लाख रुपयांमध्ये फसवणूक केली.
पंढरी चौधरी यांनी पहूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अनिलकुमार बोहरा यांच्याविरुद्ध १७ऑक्टोबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही फसवणूक मोठ्या रकमेची असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. त्यानुसार या शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी तत्काळ पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.