---Advertisement---
धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वीनजीक भरधाव वेगाने येणारी दुचाकी गतिरोधकावर आदळल्याने दुचाकीच्या मागे बसलेल्या ४० वर्षीय महिलेला जीव गमवावा लागला आहे. सरला जाधव (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे.
धुळे तालुक्यातील अनकवाडी येथील सरला जाधव ह्या एमएच १८ सीएच ७०१९ या क्रमांकाच्या दुचाकीवर मागे बसल्या होत्या. दुचाकीचालक भूषण नाना जाधव (वय २४, रा. अनकवाडी, ता. जि. धुळे) हा भरधाव वेगाने दुचाकी चालवत होता.
आर्वी येथील रस्त्यावर असलेल्या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने, भरधाव दुचाकी थेट गतिरोधकावर आदळली. या धडकेमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि मागे बसलेल्या सरला जाधव खाली फेकल्या गेल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृत महिलेचे पती अनिल अभिमान जाधव (वय ४६, रा. अनकवाडी) यांनी धुळे तालुका पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, दुचाकीस्वार भूषण जाधव याच्याविरुद्ध निष्काळजीपणाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




