---Advertisement---
जळगाव : केंद्र शासनाच्या अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) वतीने दि. २५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत हैदराबाद येथून वैज्ञानिक बलून उड्डाणे करण्यात येत आहेत. वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे हैदराबादपासून २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर पडू शकणार आहेत. या बलुनांसह उपकरणे सुरक्षित परत करणाऱ्या नागरिकांना योग्य बक्षीस व झालेला खर्च परत दिला जाणार आहे.
जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, अहिल्यानगर, नागपूर, सोलापूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांत उपकरणे उतरण्याची शक्यता आहे. ही उड्डाणे हैदराबादच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ५०००६२ येथील बलून सुविधा केंद्रातून उड्डाणे करणार आहेत. ही बलून उड्डाणे १९५९ पासून महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने होत असून, यंदाही प्रयोग होणार आहेत.
बलून हायड्रोजन वायूने भरलेले असून, त्यांचा व्यास ५० ते ८५ मीटर इतका असेल. हे बलून ३० ते ४२ किलोमीटर उंचीवर वैज्ञानिक उपकरणे वाहून नेतात आणि काही तासांच्या प्रयोगानंतर रंगीत पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरतात. अशा उपकरणे किंवा पॅराशूट आढळल्यास ती उघड्डू किंवा हलवू नयेत. उपकरणांशी छेडछाड केल्यास मौल्यवान वैज्ञानिक माहिती नष्ट होऊ शकणार आहे.
… तर बक्षीस दिले जाणार नाही
काही उपकरणांवर उच्च विद्युत दाब (हाय व्होल्टेज) असू शकतो; त्यामुळे त्यांना कुणीही हाताळू नये. अशा वस्तू आढळल्यास जवळचे पोलिस ठाणे, पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा प्रशासनाशी तत्काळ संपर्क साधावा. उपकरणे सुरक्षित परत करणाऱ्या नागरिकांना योग्य बक्षीस व झालेला खर्च परत दिला जाईल. मात्र उपकरणांशी छेडछाड झाल्यास बक्षीस दिले जाणार नाही.









