---Advertisement---
जळगाव : मनाला चटका लावून जाणारी बातमी जळगाव जिल्ह्यातून समोर आली आहे. सासऱ्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सुनेचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भुसावळ येथे घडली असून, या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस खात्यातील निवृत्त अधिकारी प्रदीपसिंह परदेशी हे आपल्या कुटुंबियांसह यावल रोड भागातील तापी पॅलेस अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. दरम्यान, वडील प्रतापसिंह परदेशी (वय ९२) यांचे दि. ३० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री निधन झाले.
सासरे प्रतापसिंह परदेशी यांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सुनबाई तुळजादेवी परदेशी (वय ६०) यांचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सासरे प्रतापसिंह परदेशी यांच्या निधनानंतर तुळजादेवी नातेवाइकांशी बोलत असताना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवून कोसळल्या.
पती प्रदीपसिंह यांनी तात्काळ धाव घेत पत्नीला रुग्णालयात दाखलकेले मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एकाच दिवशी घडलेल्या या दुहेरी घटनेने भुसावळ शहरात दुःखाचे सावट पसरले. दि. १ नोव्हेंबर रोजी दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
तुळजादेवी परदेशी शिक्षिका म्हणून होत्या कार्यरत
तुळजादेवी परदेशी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सासऱ्यांची सेवा ही त्यांनी आपल्या जबाबदारीसारखी नव्हे, तर मुलगी म्हणून केली.
वयोमानामुळे प्रतापसिंह यांची प्रकृती ढासळल्याने दि. ३० ऑक्टोबर रोजी रात्री १२:१५ वाजता त्यांचे निधन झाले. या दुःखद घटनेनंतर तुळजादेवी नातेवाइकांशी बोलत असताना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवून कोसळल्या.









