---Advertisement---
चंद्रशेखर जोशी, तरुण भारत निवासी संपादक : राजकीय कोलांटउड्यांवर काही प्रश्न नेहमी उपस्थित होत असतात. ते म्हणजे, नेत्याने वा प्रमुख कार्यकर्त्यांनी किती वेळा पक्ष बदलविला. बदलाची कारणे, ज्या गटाने वा व्यक्तीने बदल केला त्या बदलाने किती लोकांना फायदा झाला? यासारखे प्रश्न सामान्यांना पडत असतात. मग ते राजकारण गल्लीतील असो वा दिल्लीतील. चर्चा या होतातच. पण या चर्चा फार काळ टिकतात का? लोकांच्या मनात हा विषय किती काळ रहातो…
तसे पाहिले तर या कोलांट उड्या नैतिकदृष्ट्या योग्य कधीच म्हणता येणार नाहीत. लोकशाहीच्या विश्वासाला यामुळे ठेच पोहोचू शकते. जळगाव जिल्ह्यात यापूर्वीचाही इतिहास आहेच. साधारणतः सत्ता बदलती की काही राजकीय मंडळी बदलते. जणू सत्तेच्या खुर्चीशिवाय ही मंडळी राहूच शकत नाही आणि राजकीय पक्षही असे झाले आहेत की कुणाला प्रवेश द्यावा… या व्यक्तीचा खरोखर काय फायदा? याचा फार गांभीर्याने विचार केलाच जात नाही. पक्षात डोके वाढवून नेमके काय साध्य होणार याचा फारसा गांभीर्याने विचार होत नाही. बरीच मंडळी पक्षांतर केवळ स्वार्थासाठी करत असतात. या पक्षात कितपत भविष्य आहे… याचाच विचार केला जात असतो.
‘स्वार्थो यत्र न सिध्यति, न तत्र सत्यं नच धर्मः स्वार्थी हि धर्मः इति लोके प्रतिष्ठितम् … याचा अर्थ जिथं स्वतःचा स्वार्थ साधत नाही. तिथे ना सत्य टिकते. ना धर्म टिकतो… या क्षेत्रात सद्यः स्थितीत स्वार्थ हाच धर्म बनून बसला आहे. तत्व, निष्ठा यांना अजिबात थारा नसल्याचेच लक्षात येते. आता उदाहरणच द्यायचे म्हटले म्हणजे, जिल्ह्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मारल्या जाणाऱ्या कोलांटउड्यांचेच देता येईल. अनेकांची भावना आता निर्माण झाली आहे की भविष्य हे भारतीय जनता पक्षातच आहे.
विधानसभा निवडणूक काळात कसे हिरवे वादळ उठले होते… लोकसभा निवडणुकीप्रसंगी ‘वोट जिहाद’चा कसा फटका बसला. त्यामुळे बेफिकीर राहू नका. शिवसेना (उबाठा) तून बाहेर पडलेली बरीच मंडळी सत्तापिपासू आहेतच आहे. काहींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आज ही मंडळी म्हणतेय शहर विकासासाठी आम्ही भाजपसोबत आलोय… पण यात सत्य किती. कारण जेव्हा महापालिकेत भाजपची सत्ता होती त्यावेळी याच मंडळींनी डावपेच टाकून भाजपची सत्ता ताब्यात घेतती होती.
राजकारणात कोणीही कुणाचा कायम शत्रू नसतो हे काही मर्यादेपर्यंत ठिक आहे, मात्र त्यावेळी जी खेळी झाली… ज्यांना आपले संबोधले जात होते त्यांनीच कसा खंजीर खुपसला… ह्यात असलेले हे ‘जयचंद’ पुन्हा प्रवेशासाठी उतावीळ होत असतील तर सावध राहिलेले बरे. आगामी काळ हा निवडणुकांचा आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील उडी यशस्वी ठरली तर मज्जाच मज्जा… या भूमिकेत बरीच मंडळी आहे. त्यामुळे गत काही काळापासून पक्ष प्रवेशाचे सोहळे राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून जिल्हा पातळ्यांवर सुरू आहे.
प्रवेश द्या हरकत नाही पण अटी नसाव्यात… तसे करून बघा कोणी येण्याची हिंमत दाखवेल का? या प्रवेश सोहळ्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसतेय…. त्यांनाही जपा… अडचणीच्या काळात त्यांनीच ‘झंडा उचा रहे हमारा’चा नारा दिला होता… येणारे जयचंद हुशार आहेत… त्यांचा गनिमी कावा वेळीच लक्षात घेतला जावा..!









