---Advertisement---
जळगाव : पैसे काढण्यासाठी स्टेट बँकेच्या एटीएम मशीन कॅबीनमध्ये आलेल्या शेतकऱ्याचे भामट्याने त्यांच्या एटीएम कार्डाची हातचलाखीने अदलाबदल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या बँक खात्यातून २८ हजार रुपयांची रोकड काढुन घेत फसवणूक केली. हा प्रकार शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत एटीएम कॅबीनमध्ये घडला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
५१ वर्षीय शेतकरी शहरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी ते गुरुवारी दुपारी शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत आले होते. तेथील एटीएम मशीनच्या कॅबीनमध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका संशयिताने शेतकऱ्याला बोलण्यात गुंतविले.
त्याचवेळी त्याने शेतकऱ्याचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलुन घेतले. त्याच्याजवळील कार्ड त्यांने हातात देत शेतकऱ्याचे एटीएम कार्ड घेत पोबारा केला. त्यानंतर या भामट्याने त्याच दिवशी कोणत्या तरी एटीएम मशीनवर जावुन शेतकऱ्याच्या खात्यातून २८ हजार रुपये काढुन घेतले.
रक्कम विड्रॉल झाल्याचा मॅसेज प्राप्त झाल्यानंतर फसवणूक झाल्याचा प्रकार शेतकऱ्याच्या लक्षात आला. याप्रकरणी तक्रारीनुसार याप्रकरणी शुक्रवारी (७ नोव्हेबर) जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलीस हवालदार भारती देशमुख तपास करीत आहेत.
विश्वास ठेवु नका
तुम्ही बँकेत कामानिमित्त गेलात तर कोणी तरी तुमच्याशी आदरयुक्त भाव आणत मदत करण्याचा आव आणू शकतो. तुमचे एटीएम कार्ड किंवा एटीएम पीन जाणुन घेण्याचा प्रयत्न करु शकतो. अशा प्रकारातून फसवणूक होण्याचा धोका वाढतो.
त्यामुळे बँकेच्या कोणत्याही कामाच्या संदर्भात माहिती जाणुन घेण्यासाठी बँकेत जावुन अधिकाऱ्यांशी विचारविनिमय केला पाहिजे. ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांना भामटे लक्ष्य करु शकण्याची जास्त शक्यता असते. तुमचे कष्टाचे पैशांवर कोणी डल्ला मारणार नाही, यासाठी सजग असणे आवश्यक आहे.









