---Advertisement---
नंदुरबार : मजूर कापूस वेचणीच्या कामात गर्क असतानाच अचानक बिबट्याची डरकाळी ऐकू आली आणि मजुरांनी हातातील काम सोडून धूम ठोकली. ही घटना घडली तळोदा तालुक्यातील खरवड परिसरात घडली. या भागात बिबट्याचा संचार असून शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
तळोदा तालुक्यातील खरवड परिसरात कापूस वेचणीचा हंगाम सुरू झाला असल्याने शेतकऱ्यांना मजुरांच्या टंचाईचा मोठा फटका बसत आहे. त्यातच बिबट्याची दहशत वाढत आहे. परिणामी, कापूस वेचणीचा वेग मंदावला असून शेतकऱ्यांवर मजूर उपलब्धतेची आफत ओढवली आहे.
गेल्या महिन्यात बिबट्याने तन्हावद येथील एका तीन वर्षीय बालिकेवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात बालिका गंभीर जखमी झाली होती. तसेच काही ठिकाणी जनावरांवरही हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मागील महिन्यात तन्हावद शिवारात वन विभागाने हिंस्र प्राण्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले असले तरी तो अद्याप सापडलेला नाही. शनिवारी खरवड शिवारात कापूस वेचणी सुरू होती.
मजूर वर्ग कापूस वेचणीत मग्न असताना बिबट्याने मोठी डरकाळी फोडली. त्यामुळे मजुरांची धावपळ उडाली व घराकडे धूम ठोकली. या पार्श्वभूमीवर बिबट्याला जेरबंद करून सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
सध्या कापूस वेचणीच्या हंगाम सुरू आहे. मजूर वर्गाने रोजगारासाठी स्थलांतर केल्याने कापूस वेचणीला मजूर मिळणे कठीण झाले आहे. जेमतेम मजूर मिळत असताना आता बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने मजूर कामाला येत नसल्याची स्थिती आहे.








