---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह । अयोध्या : श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पुढील वर्षी 22 जानेवारीला कायमस्वरूपी गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्याची तारीख निश्चित केली आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी ही माहिती दिली. हॉटेल क्रिनोस्को येथे उत्तर प्रदेश सराफा मंडळ असोसिएशनच्या प्रांतीय अधिवेशनाला ते संबोधित करत होते. ते म्हणाले की, कायम गर्भगृहात रामललाचा अभिषेक करण्याबाबत यापूर्वी अनेक तारखांचा विचार करण्यात आला होता, परंतु अखेर अनेक टप्प्यांत झालेल्या चर्चेनंतर हा विधी 22 जानेवारी 2024 रोजी पूर्ण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
ही तारीख लक्षात घेऊन ऑक्टोबरपर्यंत रामललाची मूर्ती आणि त्यापूर्वी सप्टेंबरपर्यंत गर्भगृहाचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गर्भगृहाच्या बांधकामात मकराना संगमरवरी वापरण्यात येत आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चंपतराय यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सराफा व्यापाऱ्यांसमोर मंदिर उभारणीची प्रक्रिया सांगितली. ते म्हणाले की तळमजल्यावर फक्त रामललाच बसतील. पहिल्या मजल्यावर राम दरबार असेल, तर दुसरा मजला रिकामा असेल, ज्याचा वापर मंदिराच्या उंचीसाठी केला जाईल. शिखर, आसन, दरवाजामध्येही सोन्याचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गर्भगृहापर्यंत जाण्यासाठी 34 पायऱ्या करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी, उत्तर प्रदेश सराफा असोसिएशनचे अध्यक्ष महेशचंद्र जैन यांनी चंपातार्इंचा पुष्पहार अर्पण करून सत्कार केला आणि मंदिराशी संबंधित माहिती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.









