तरुण भारत लाईव्ह । जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष तथा एकेकाळी जळगावचे जिल्हाधिकारी राहिलेले किशोर राजेनिंबाळकर यांच्या साधेपणाचा अनुभव जळगावकरांनी सोमवारी पुन्हा एकदा घेतला. एमपीएससीचे अध्यक्ष असूनही त्यांनी नवीन बसस्थानकाशेजारील गरिबांचे भोजनालय म्हणून प्रसिद्ध क्षुधाशांती भोजन केंद्र येथे जेवणाचा आस्वाद घेतला. सेवाभावी केशवस्मृती प्रतिष्ठानचा 32वा वर्धापन दिन 9 मे रोजी साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर 8 मे रोजी त्यांनी दिलेल्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
किशोर राजेनिंबाळकर यांनी जळगाव येथे जिल्हाधिकारी म्हणून पदभार सांभाळला आहे. त्यांच्या काळात त्यांचा साधेपणा वारंवार दिसून आला आहे. शेतकरी कुटुंबातील जन्म असल्याने त्यांची जमिनीशी नाळ अजूनही टिकून आहे. आजचे काम आजच संपवावे, यावर त्यांचा कायम भर राहिला आहे. मी लोकसेवक आहे, ही मनात भावना ठेवली, तर काम करताना कुठेही, कोणतीही अडचण येत नाही, असे ते नेहमी आपल्या सहकार्यांना सांगत असतात.
किशोर राजेनिंबाळकर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. निंबाळकर जळगावात दोन दिवसांपासून काही कामानिमित्त आले आहे. सोमवारी त्यांनी जेवणासाठी गरिबांसाठी असलेले क्षुधाशांती केंद्रात जाणे पसंत केले. या ठिकाणी त्यांनी शेवभाजी, बटाटा भाजी, पोळी, मट्ठा, नागली पापड असे खान्देशी साधे जेवण घेतले. त्यांच्यासोबत वास्तुविशारद शिरीष बर्वे, शिपाई आणि सुरक्षारक्षकदेखील उपस्थित होते.
क्षुधाशांतीतील जेवणाने शांती व तृप्ती मिळते
मी नेहमीच क्षुधाशांती येथे जेवणाला येत असतो, मला येथे शांती व तृप्ती मिळते. संधी मिळाली की, क्षुधाशांती भोजन केंद्रात नेहमी जेवण करण्यासाठी येतो. येथील भोजन मला आवडते. क्षुधाशांती केंद्रातील कर्मचारी चांगली सेवा देतात, असे किशोर राजेनिंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.