---Advertisement---
भुसावळ : सरस्वतीच्या ज्ञान मंदिरात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याने आपला तोरा वाढण्यासाठी चक्क बिहारातून पिस्टल आणत ते शाळेत आणल्याचा धक्कादायक प्रकार भुसावळ शहराजवळील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता घडला. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीती पसरली तर पोलीस प्रशासनाला माहिती दिल्यानंतर विद्यार्थ्याला ताब्यात घेवून कट्टा जप्त करण्यात आला. या प्रकरणी भुसावळातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याचे वडिल रेल्वेत कर्मचारी असल्याची माहिती आहे.
अचानक तपासले दप्तर, निघाला कट्टा
भुसावळ शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या रेल्वे कर्मचार्याचा मुलगा 2017 पासून अकलूदजवळील पोदार शाळेत शिक्षण घेत असून हल्ली तो नववीच्या वर्गात आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी शाळा भरल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केल्यानंतर नववीच्या एका विद्यार्थ्याच्या दप्तरात गावठी कट्टा आढळल्यानंतर शिक्षकांनाही धक्का बसला. शाळा प्रशासनाला ही बाब कळवल्यानंतर फैजपूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ व सहकार्यांनी धाव घेत कट्टा जप्त केला तर विद्यार्थ्यालाही चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी संशयित विद्यार्थ्याविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.










