---Advertisement---
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. सध्या देशात मोदींच्या विरोधात वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मी पुन्हा येणार असं म्हणालेत खरं. पण त्यांच्या बोलणं देवेंद्र फडणवीस यांच्या सारखं आहे. फडणवीसही पुन्हा आले होते. पण खालच्या पदावर… मोदींचीही तीच अवस्था आहे, असं शरद पवार म्हणाले. याला आता मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे.
शरद पवारजी, तुम्ही लिहून ठेवा. 2/3 बहुमताने एनडीए निवडून येईल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असं म्हणत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
शरद पवार यांची बीडमध्ये सभा होतेय. त्यावरही उदय सामंत यांनी टिपण्णी केली आहे. शरद पवार त्यांचे विचार मांडतील. अजित पवार त्यांचे विचार मांडतील. शिवसेना म्हणून आम्ही विचार मांडू. आम्ही लोकांनी विचार मांडल्यानंतर लोक त्यावर विचार करतील अन् योग्य ती भूमिका घेतील. मतदानात लोकं ठरवतील, कुणाला मतदान करायचे ते, असं उदय सामंत म्हणालेत.
शरद पवार सोबत आले तरच अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपद दिलं जाईल, अशी पंतप्रधान मोदींची भूमिका असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. त्यावर उदय सामंत यांनी भाष्य केलंय. आपण राष्ट्रवादीच्या, भाजपच्या, शिवसेनेच्या विरोधात बोलत आहोत.याची दिल्लीत नोंद व्हावी यासाठी ही लोक बोलत असतात. त्यांच्या मनात खरं काय आहे, हे मी सवडीने सांगेल, असं उदय सामंत म्हणालेत.