बंगळुरू : कर्नाटकात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसच्या एका मित्र पक्षाने थेट भाजपशी हातमिळवणी केल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेससाठी आणि पर्यायाने इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांच्या जनता दल सेक्यूलर (जेडीएस) आणि भाजपमध्ये युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही मुद्द्यांवर या दोन्ही पक्षांचं एकमत झालं असून केव्हाही युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप आणि जेडीएसच्या युतीमुळे कर्नाटकातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर भारतीय जनता पार्टीनं आता कर्नाटकावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकार आहे. भाजपा दक्षिणेतील प्रवेशद्वारात पुन्हा शिरकाव करण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतीय जनता पार्टी आणि जनता दल सेक्यूलर यांच्यात आघाडीची चर्चा सुरू आहे. एका वृत्तानुसार, जेडीएस प्रमुख एचडी देवगौडा यांची आघाडीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्याशी भेटही झाली आहे. जेडीएससोबत युतीवर प्राथमिक चर्चाही पार पडली.
भाजपचे नेते बीएस येडीयूरप्पा यांनीही या युतीला दुजोरा दिला आहे. एचडी देवगौडा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. त्यांच्यात चार जागांवर फायनल चर्चा झाली आहे, असं येडीयूरप्पा यांनी स्पष्ट केलं आहे. येडियुरप्पा म्हणाले की, देवगौडा आमच्या पंतप्रधानांना भेटले त्याचा आनंद आहे. जेडीएसकडून ५ जागा मागितल्या जात आहेत. त्यात जेडीएस मांड्या, हासन, तुमाकुरू, चिकबल्लापूर आणि बंगळुरू ग्रामीण या जागेसाठी जेडीएस आग्रही आहे.
चिकबल्लापूर लोकसभा जागा वगळता इतर ४ जागांवर ज्याठिकाणी देवगौडा अथवा त्यांच्या कुटुंबातील कुठला ना कुठला सदस्य निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. मांड्या लोकसभा जागेवर २०१९ मध्ये माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे चिरंजीव निखील कुमारस्वामी, तुमकुर जागेवरून स्वत: एचडी देवगौडा, हासन जागेवरून नातू प्रज्वल रेवन्ना हे उमेदवार होते. बंगळुरू ग्रामीण जागेवर २०१४ मध्ये निवडणुकीत एचडी कुमारस्वामी यांची पत्नी अनिता कुमारस्वामी उमेदवार होत्या. या सर्व जागा वोक्कालिगा समुदायाची ताकद असलेले मतदारसंघ आहेत.
भाजपा-जेडीएस युतीने काय समीकरणं बदलणार?
भाजपा आणि जेडीएस जर एकत्र आले तर दक्षिण भारतातील या राज्यात सामाजिक आणि राजकीय समीकरण पूर्णत: बदलतील. कर्नाटकातील लोकसंख्येच्या १७ टक्के हिस्सा असलेला लिंगायत समाज भाजपाचा पारंपारिक मतदार मानला जातो. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हे लिंगायत समुदायातून येतात. तर लिंगायत समुदायानंतर १५ टक्के लोकसंख्या असलेला वोक्कालिगा समुदाय दुसरा प्रभावशाली समाज आहे. वोक्कालिगा समाज पारंपारिक जेडीएसचा मतदार मानला जातो. त्यामुळे भाजपा-जेडीएस एकत्र आल्यास एनडीएच्या पारड्यात ३० टक्क्याहून अधिक मतदान होऊ शकते.