मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
मागच्या काही दिवसांपासून उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अनेक वक्तव्य केली. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर हे नेते विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकत आहेत. असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रात केला आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ते म्हणाले की, ” उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि अंबादास विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकण्यासाठी सातत्याने वक्तव्ये करत आहेत. त्यांची विधाने राजकीय हेतूने प्रेरित आहेत. राज्यात आमदारांच्या अपात्रतेबाबत सुरू असलेली सुनावणी प्रलंबित असताना, त्यांची वक्तव्ये कारवाईवर परिणाम करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्यात यावी.”