---Advertisement---

पोलीस कॉन्स्टेबल खून प्रकरण; खटला जाणार फास्ट ट्रॅक कोर्टात

---Advertisement---

जळगाव  : मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असणारे चाळीसगाव येथील रहिवासी शुभम याची किरकोळ वादातून भर रस्त्यात निर्घुणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक व्हावी व शुभम आगोणे खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, यासाठी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ राज्याचे पोलीस महासंचालक व जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक यांना फोन करून याबाबत आरोपींविरोधात सक्त कारवाईच्या सूचना दिल्या तसेच सदर प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. पोलिसांवर असा हल्ला सहन केला जाणार नाही असा संदेश पोहोचविणे गरजेचे असल्याने आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी शुभम आगोणे खून खटला हा फास्ट ट्रॅक वर नेण्यासाठी स्वतः लक्ष घालावे तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा आरोपींना लावण्याबाबत देखील त्यांनी पोलीस महासंचालकांना व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या शुभम आगोणे खून प्रकरणाच्या तपासाला आता अधिक गती मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शुभम आगोणे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले होते. तसेच या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या आक्रोश मोर्चात देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले होते.

कै.शुभम चे वडील अनिल आगोणे हेदेखील पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत. एक चांगला क्रिकेटपटू असणारा शुभम एक मनमिळावू आणि सर्वांशी आपुलकीने वागणारा होता. त्याच्या पश्चात आईवडील, पत्नी व १ वर्षाचा लहान मुलगा आहे. एका पोलिसाच्या दिवसाढवळ्या हत्येमुळे सर्व चाळीसगाव तालुका शोकसागरात बुडाला असून आरोपींविषयी तीव्र संतापाची लाट जनमानसात उसळली होती. कै.शुभम ला न्याय मिळावा म्हणून दि.२२ जानेवारी रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन चाळीसगाव शहरात करण्यात आले होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment