---Advertisement---
जळगाव : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेतर्फे काढण्यात आलेल्या महाप्रबोधन यात्रेतून सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील प्रमुख नेत्यांना लक्ष्य केलं आहे. त्यावरुन, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे ह्या तीन महिन्यांचं बाळ असून त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर काय टीका केली याच्या क्लिप एकदा ऐका, असं म्हणत टोला लगावला होता. यावर सुषमा अंधारे यांनी आज जळगावमध्ये पत्रकारांशी बोलतांना जोरदार पलटवार केला आहे.
महाप्रबोधन यात्रेतील दुसर्या टप्प्यासाठी सुषमा अंधारे आजपासून जळगाव जिल्ह्यात आल्या आहेत. या अनुषंगाने जळगावात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या की, गुलाबराव पाटील मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील, तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला अधिकार आहे, असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं.
आमदारांमुळे शिवसैनिक नसतात तर शिवसैनिकांमुळे आमदार असतात. लोकांचे पाठबळ नसल्यानेच आमदारांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. शिवसेना ही अन्यायाविरोधातली मशाल हातात घेऊन कोणत्याही दवाबाला बळी न पडता अत्यंत निष्ठेने आणि ठामपणे उभी असेल. सध्या महाराष्ट्राला कंगाल करण्याचे राजकारण सुरु आहे, असल्याचे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.