---Advertisement---
अडावद ता. चोपडा : चांदसणी- कमळगाव येथील २० ते २५ जणांना पाणीपुरी खाल्ल्यावर झालेल्या विषबाधा प्रकरणात आरोग्य विभागाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी आज बुधवारी अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून रुग्णांची विचारपूस करुन घटनेचा आढावा घेतला. दरम्यान, जिल्हाभरात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेच्या मुळाशी जाऊन यात साथीच्या आजाराचीही लागण तर झाली नाही ना ? याबाबत आरोग्य विभागाने दक्ष राहणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
चोपडा तालुक्यातील चांदसणी- कमळगाव येथे १७ रोजी आठवडे बाजार होता. या बाजारात आबालवृद्ध ग्रामस्थांनी पाणीपुरी विक्रेत्याकडून पाणीपुरी खाल्ली. यातील २० ते २५ जणांना १८ रोजी सकाळपासून ताप, उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार करुन घेतले परंतु सायंकाळपर्यंत अडावद प्रा. आ. केंद्रात रुग्णांची रीघ लागून चांदसणी, कमळगाव, पिंप्री, मितावली या चार गावातील शेकडोवर रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याने एकच धावपळ उडाली.
चांदसणी येथील २१, कमळगाव २१, पिंप्री २५, मितावली ७ असे बघताबघता अवघ्या तासाभरात ७४ विषबाधा झालेले रुग्ण प्रा. आ. केंद्रात दाखल झाल्याने रुग्णालयात नागरिकांची तोबा गर्दी झाली. यात बऱ्याच जणांना अत्यवस्थ वाटू लागल्याने ३२ जणांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात तर २ जणांना जळगाव सिव्हिलला हलविण्यात आले. आजरोजी रुग्णांची प्रकृती स्थिर असली तरी या चारही गावातील ग्रामस्थ प्रचंड भयभयीत झाले आहेत.
अडावद प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पाटील व रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच खाजगी डॉक्टर डॉ. विश्वनाथ पाटील, डॉ. मनीष अडावदकर, डॉ. अजय महाले, डॉ. प्रफुल्ल पाटील तसेच लासुर प्रा.आ.केन्द्राचे डॉ. नितीन अहिरे, दिनेश चौधरी, माधुरी महाजन आणि लोकप्रतिनिधी व तरुणांच्या अथक परिश्रमाने रुग्णांवर तात्काळ उपचार झाल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी या घटनेने आरोग्य विभागाची झोप उडवून दिली आहे. तसेच परिसरातील पाणीपुरी विक्रेत्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप लासुरकर यांनी आज दि. १९ रोजी बाधित चारही गावांना भेटी देत आणखी काही नवीन रुग्ण नसल्याची खात्री करुन घेतली.
दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा साथ नियंत्रण अधिकारी डॉ. बाळासाहेब वाबळे, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत सुपे यांनी अडावद प्रा.आ.केद्रास भेट देवून परिसरातील पाणीपूरी विक्रेत्यांना नोटीसा देण्याच्या सुचना दिल्या. तसेच या चारही गावातील पाणी पुरवठ्याचे नमुने आरोग्य विभागाने तपासणीसाठी घेतले आहेत. कारण वरकरणी जरी ही घटना पाणीपुरीमुळे घडली असल्याचे बोलले जात असले तरी या दिवसांमध्ये साथीच्या आजारांची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याने आरोग्य विभागाने विविध शक्यता पडताळून पाहण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका तथा भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील यांनी राकेश पाटील, हनुमंत महाजन, उमेश कासट, गौरी जोशी व आपल्या सहकाऱ्यांसह प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.