---Advertisement---
Maharashtra Budget 2024 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने बजेटमध्ये तरतुदी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आज शुक्रवारी सभागृहामध्ये बोलताना अर्थमंत्री अजित पवार यांनी एक मजेशीर मुद्दा मांडला. जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला ते उत्तर देत होते.
काय म्हणाले अजित पवार ?
अर्थसंकल्पामध्ये सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत काहींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. जयंतरावांनी नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला आणि मी दहा वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यामुळे थोडाबहुत अनुभव मला आहे.
अजित पवार पुढे म्हणाले, महाविकास आघाडी असो की महायुती असो.. दोन्ही बाजूंनी मीच अर्थसंकल्प मांडलेला आहे. पण इकडनं मांडला की तिकडचे टीका करतात अन् तिकडनं मांडला की इकडचे टीका करतात.. त्यामुळे त्या टीकांमध्ये काही तथ्य नाही. बजेटमध्ये दरवर्षी ३०-३५ हजार कोटींची वाढ होतेय, केंद्राच्या विचाराचं सरकार राज्यात आलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.
भास्कर जाधवांनी मध्येच म्हटलं की, दादा तुम्ही भाषण करताय पण भाजप, शिंदेंचे मंत्री कुठेत ? त्यावर अजित पवार म्हणाले, माझ्यावर बाकीच्यांचा इतका डोळे झाकून विश्वास आहे की मला एकट्यालाच उत्तर द्यायला सांगितलं. बाकी पण महत्त्वाची कामं असतात, राज्य झपाट्यानं पुढं जात आहे भास्करराव… असं म्हणत अजित पवारांनी उत्तर दिलं.