---Advertisement---
पुणे/जळगाव । सध्या गुजरातच्या किनारपट्टीपासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे अरबी समुद्रातून वेगाने बाष्पयुक्त वारे किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे घाटमाथा ओलांडून पाऊस महाराष्ट्रात दाखल होत आहे. परिणामी महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. आजपासून राज्यात पुढील तीन चार दिवस तुफान पावसाची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?
आज पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर दुसरीकडे विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी कऱण्यात आला असून वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जळगावला १४ आणि १५ जुलैला येलो अलर्ट?
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात पावसाने हजेरी हजेरी लावली. मात्र मागील बुधवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. जिल्ह्यात अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. परंतु पावसाने हुलकावणी दिली. दरम्यान, उद्या १४ आणि १५ जुलै रोजी जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.