---Advertisement---
Dhule News : धुळे मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी तयार केलेल्या शाडू मार्तीच्या आकर्षक गणेश मुर्त्या यंदाही भाविकांसाठी उपलब्ध होणार आहेत. कारागृहातील बंदीवान मूर्ती बनविण्याच्या कामात जुंपले असून, आतापर्यंत २१ प्रकारच्या जवळपास ५०१ मुर्त्या बनविल्या आहेत.
गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. गणपतीचे स्वागत करण्यासाठी भाविकांमध्ये उत्साह वाढत चालला आहे. लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी गणेश भक्त तयारीला लागलेले आहे. धुळे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेले दहा कैदी हे या मूर्ती बनविण्याच्या कामात जुंपले आहेत.
गेल्या वर्षी देखील कारागृह प्रशासनातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाला धुळेकर गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद देखील दिला होता. त्यामुळे यंदा देखील कारागृह प्रशासनातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई गणपती, गरुडावर विराजमान गणपती, बालगणेश, फेटा घातलेले गणेश अशा मुर्त्या बनविल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व मुर्त्या पर्यावरण पूरक असून शाडू मातीच्या सहाय्याने या सर्व मुर्त्या बनविण्यात आल्या आहे. या मुर्त्या कारागृह प्रशासनातर्फे बाजारात देखील विकण्यात येणार आहेत. कारागृहातील बंदिवानांच्या हाताला काम मिळावे. त्यांच्या कलागुणांचा वापर करून त्यांना दोन पैसे पदरात पडावेत, या उद्देशाने कारागृह प्रशासनातर्फे हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.
---Advertisement---