---Advertisement---
जळगाव : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत तिचा खून करत स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे प्र.दे. येथे मंगळवार,२७ रोजी ही घटना उघडकीस आली. लक्ष्मीबाई (२६) व गोपाल पावरा उर्फ बारेला (३०) असे मयत पती-पत्नीचे नाव आहे.
तळोंदे प्र.दे. शिवारातील शिवाजी पाटील (रा. पिंप्री बुद्रूक प्र.दे.) यांच्या शेतातील खोलीत गोपाल पावरा उर्फ बारेला हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तर, लक्ष्मीबाई हिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून तिचा दोरीने गळा आवळल्याने तिचासुद्धा मृत्यू झाल्याचे आढळले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे, उपनिरीक्षक विकास शिरोळे, पो.ना. प्रकाश कोळी, नंदकिशोर महाजन, हनुमंत वाघेरे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात मयत गोपाल पावरा याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पत्नी लक्ष्मीबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ व मारहाण करून तिला मारून टाकण्याची धमकी गोपाल हा नेहमी द्यायचा. याच कारणावरून त्याने लक्ष्मीबाईची हत्या केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.