---Advertisement---
जळगाव : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानात २ रुपयांनी वाढ केली असून, आता शेतकऱ्यांना प्रतिलीटर मागे ७ रुपये अनुदान दिले जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यात २६ हजार ५८८ सभासद दूध पुरवठा करतात. त्यापैकी १६ हजार शेतकरी गायीच्या दुधाचा पुरवठा करतात. राज्यात १६० लाख लीटर गायीच्या दुधाचे प्रतिदिन संकलन होते. दूध उत्पादकांना प्रति लीटर पाच रुपये अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये दोन रुपयांची वाढ करून ते सात रुपये देण्यात येणार आहे. दूध उत्पादकांना दूध संघांनी ३.५ फॅट /८.५ एसएनएफ या प्रतिकरिता १ ऑक्टोबर २०२४ पासून २८ रुपये प्रतिलीटर इतका दर देणे बंधनकारक आहे.
त्यानंतर दूध उत्पादकांना शासनामार्फत सात रुपये प्रतिलीटर त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील. त्यामुळे या शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलीटर ३५ रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे. ही योजना १ ऑक्टोबर २०२४ पासून राबविण्यात येणार आहे.
भुकटी अनुदान योजना बंद
दूध उत्पादकांना दोन रुपये वाढीस अनुदान देण्याच्या निर्णयाच्या सोबतच दूध भुकटी निर्यातीस प्रती किलो ३० रुपये प्रोत्साहनपर अनुदान व दूध भुकटी रुपांतरणास प्रति लीटर दीड रुपये अनुदान ३० सप्टेंबरनंतर बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. पर्यायाने ही योजनाच शासनाने गुंडाळली आहे.