Venkatesh Iyer : इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा लिलाव गेल्या आठवड्यात जेद्दाहमध्ये पार पडला. या लिलावात केकेआरने सर्वात महागडा खेळाडू 23.75 कोटी रुपयांना विकत घेतला. ही रक्कम त्यांनी व्यंकटेश अय्यर याच्यावर खर्च केली. एवढी मोठी रक्कम खर्च केल्यानंतर त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधारही बनवले जाईल असे वाटत होते. मुलाखतीत स्वतः व्यंकटेश अय्यरने कर्णधार बनण्याचा मानस व्यक्त केला होता. पण, आता दुसरंच नाव समोर येत आहेत. त्यामुळे केकेआरचा नवा कर्णधार नक्की कोण होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला १.५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. रहाणे यापूर्वी CSK चा भाग होता. रहाणेला आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि सीएसकेचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. अशा परिस्थितीत केकेआर जर त्याला कर्णधारपद देण्याचा विचार करत असेल तर साहजिकच त्याचा अनुभव त्यांना उपयोगी पडेल.
सूत्रांनुसार, सध्या ९० टक्के पुष्टी झाली आहे की अजिंक्य रहाणे केकेआरचा नवा कर्णधार होऊ शकतो. केकेआरने त्याला विशेष कारणासाठी विकत घेतले. मात्र, याला अधिकृत मान्यता मिळणे बाकी आहे.
3 वेळा आयपीएल चॅम्पियन केकेआरसोबत अजिंक्य रहाणेची ही दुसरी टर्म असेल. यापूर्वी, तो आयपीएल 2022 मध्ये या फ्रँचायझीचा भाग होता, जिथे त्याने 7 सामन्यात 103.91 च्या स्ट्राइक रेटने 133 धावा केल्या.
रहाणे आयपीएल 2023 मध्ये CSK चा भाग बनला, जिथे त्याने 14 सामन्यांमध्ये 172.49 च्या स्ट्राइक रेटने 326 धावा केल्या. या वर्षी सीएसकेने विक्रमी पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले.
IPL 2024 रहाणेसाठी चांगले गेले नाही, जिथे त्याने CSK साठी 123.47 च्या स्ट्राइक रेटने केवळ 242 धावा केल्या. यंदा हा संघ प्लेऑफसाठीही पात्र ठरू शकला नाही.