कटक: भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या अत्यंत खराब फॉर्ममध्ये असून, ‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित आता ‘फ्लॉपमॅन’ म्हणून चर्चेत आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला थोड्याच वेळात सुरवात होणार असून, यात रोहित शर्मा सूर गवसेल का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. त्याच वेळी, पहिल्या सामन्यातून बाहेर राहिलेला विराट कोहली यावेळी मैदानात उतरेल का, हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
नागपुरात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर चार गड्यांनी मात करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता कटकमध्ये होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवत मालिका खिशात घालण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
हेही वाचा : दारू पाजली अन् केला जबरदस्तीचा प्रयत्न; नकार दिल्याने… नागपुरात अमानवीय कृत्य
पहिल्या सामन्यात विराट कोहलीला उजव्या गुडघ्यावर सूज आल्याने विश्रांती देण्यात आली होती. मात्र, त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या मध्यफळीवर दबाव आला होता. पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीआधी त्याच्या फिटनेसबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, उपकर्णधार शुभमन गिल याने कालच स्पष्ट केले की, कोहली या सामन्यात खेळण्यास सज्ज आहे.
संघ व्यवस्थापनापुढे डोकेदुखी
जर कोहली अंतिम एकादशमध्ये परतला, तर व्यवस्थापनाला संघनिवडीसाठी कठीण निर्णय घ्यावा लागेल. पहिल्या सामन्यात मध्यफळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्याने कोणाला वगळायचे, हा पेच संघासमोर असेल. तसेच, रोहित शर्माच्या फॉर्मबाबतही मोठी चिंता आहे. त्याला या सामन्यात मोठी खेळी करणे आवश्यक आहे, अन्यथा त्याच्यावर टीकेचे तीव्र वार होण्याची शक्यता आहे.
कटकमधील हा सामना भारतासाठी निर्णायक ठरणार असून, रोहितच्या बॅटमधून धावा निघतात का आणि कोहली पुनरागमन करतो का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.