मुंबई : अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाल्याने शहरात बांगलादेशी घुसखोरांविरोधातील कारवाईला गती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम राबवत २४ तासांत २० बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे. या मोहिमेत आणखी काही बांगलादेशी घुसखोर रडारवर असून, त्यांच्याविरोधातही लवकरच कठोर पावले उचलली जाणार आहेत.
डोंगरी पोलिसांनी २० जानेवारी रोजी दोन बांगलादेशी घुसखोरांविरोधात गुन्हा नोंदवला होता. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक परिमल पाटील आणि त्यांचे पथक—अंमलदार वाघ, मुलानी, शिंदे, पाटील—यांनी सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली.
ही बाब लक्षात घेता पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी तातडीने विविध पोलिस ठाण्यातील १४ विशेष पथकांना कारवाईचे आदेश दिले. शनिवारी आणि रविवारी अवघ्या २४ तासांत या पथकांनी मुंबईसह ठाणे आणि आसपासच्या परिसरात जोरदार तपास मोहिम राबवली.
१६ घुसखोरांना अटक, दोघांना नोटीस
या कारवाईत मानखुर्द, वाशी नाका, कळंबोली, पनवेल, कोपरखैरणे, कल्याण, मुंब्रा आणि दारुखाना येथून १६ बांगलादेशी नागरिकांना शोधून अटक करण्यात आली आहे. यापैकी दोन जणांवर यापूर्वीच गुन्हे दाखल असल्याने त्यांना नोटीस देऊन पुढील चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
मुंबई आणि ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचे वारंवार समोर येत आहे. या प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या असून, बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीविरोधात मोठी मोहीम राबवण्याची तयारी पोलिसांकडून सुरू आहे. पुढील काही दिवसांत अशा घुसखोरांविरोधात आणखी मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
पोलीस सतर्क, नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि शेजारील भागात संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या घुसखोरांना आसरा देणाऱ्या घरमालकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.