बीड : परळी तालुक्यातील शिरसाळा येथे आठवडी बाजारात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एका गटाने रस्त्यावर उभी असलेली बुलेट गाडी पेट्रोल टाकून पेटवली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शिरसाळा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी चिकन शॉप चालक सैफ सलीम कुरेशी यांना “पोहेनर येथे व्यवसाय करायचा असेल, तर पैसे द्यावे लागतील” अशी धमकी दिली. यावरून वाद वाढत गेला आणि दोन्ही गट एकमेकांसमोर भिडले. काही वेळातच हाणामारी विकोपाला गेली आणि बाजारपेठेत गोंधळ उडाला.
हेही वाचा : पृथ्वीच्या गतीचा थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल! आभाळ स्थिर, तर पर्वत-घरं फिरताना दिसली
हाणामारीदरम्यान बाजूला उभी असलेली एक बुलेट दुचाकी पेट्रोल टाकून पेटवण्यात आली. आगीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असली, तरी सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर देखील परळी परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पोलीस तपास सुरू
या घटनेनंतर पोलीस अधिक तपास करत असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. स्थानिक नागरिकांमध्येही वाढत्या गुन्हेगारीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.