---Advertisement---

Journalist Premier League Season 1 Conclusion : चाळीसगाव संघाने पटकावले विजेतेपद, जळगाव प्रिंट मीडिया उपविजेता

---Advertisement---

जळगाव, दि.१३ ।  पत्रकारांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या पत्रकार प्रीमियर लीग पर्व १ चा समारोप सोहळा दि.१२ फेब्रुवारी रोजी जळगावात मोठ्या उत्साहात पार पडला. तीन दिवस शिवतीर्थ मैदानावर चालेल्या स्पर्धेत चाळीसगाव संघाने अंतिम सामन्यात जळगाव प्रिंट मीडिया संघाला पराभूत करत विजयी चषक पटकावला. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी चुरशीचा खेळ दाखवला, परंतु चाळीसगाव संघाने बाजी मारली.

शिवतीर्थ मैदानावर पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत अंतिम सामना खेळवण्यात आला. स्पर्धेच्या माध्यमातून पत्रकारांमधील खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन मिळाले. पत्रकारांनी आपल्या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढावा आणि जीवनाचा आनंद घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, धरणगावचे नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना (उबाठा) महानगराध्यक्ष शरद तायडे, महाराष्ट्र पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, जैन उद्योग समूहाचे अनिल जोशी, रमेशकुमार मुनोत, विक्रम मुनोत, पत्रकार सुनील पाटील, निलेश अजमेरा, नंदकिशोर पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अयाज मोहसीन, संदीप केदार यांनी केले.

महाराष्ट्रात प्रथमच स्पर्धेचे आयोजन

पत्रकारांसाठी महाराष्ट्रात प्रथमच पत्रकार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन, माजी मंत्री आ.अनिल पाटील, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, दूध संघाचे अरविंद देशमुख, आयोजक समितीचे वाल्मीक जोशी, चेतन वाणी, किशोर पाटील, जकी अहमद, सचिन गोसावी, वसीम खान, यामिनी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पहिल्याच दिवशी दिवस रात्र पद्धतीने ८ सामने खेळवण्यात आले.

महसूल, पोलीस, पत्रकार आमनेसामने

पत्रकार प्रीमिअर लीगच्या शेवटच्या दिवशी जळगाव पोलीस विरुद्ध संपादक असा मैत्रीपूर्ण सामना खेळवण्यात आला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात जळगाव पोलीस संघाने सहज विजय मिळवला. सायंकाळी महसूल विरुद्ध आयोजक समिती सामन्यात शेवटच्या षटकात आयोजक समितीने धावांचा पाठलाग करीत विजय प्राप्त केला. संपूर्ण जिल्ह्याच्या लक्ष या मैत्रीपूर्ण सामान्याकडे लागलेले होते. सामन्यानंतर चर्चेत पोलिसांनी पत्रकारांची भूमिका वठवत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांवरच प्रश्नांची सरबत्ती केली. हसत-खेळत दोन्ही सामने पार पडले. यावेळी पत्रकारांनी नियमित आरोग्य तपासणी करावी, असा सल्ला पोलीस अधीक्षकांनी दिला.

असा राहिला निकाल आणि सहभागी संघ

तीन दिवसीय स्पर्धेत अंतिम विजेता चाळीसगाव संघ ठरला तर उपविजेता संघ जळगाव प्रिंट मीडिया संघ ठरला. तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक अमळनेर संघाने तर चतुर्थ क्रमांक धरणगाव संघाने पटकावला. स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज अमळनेर संघाचा आर.जे.पाटील, बेस्ट बॉलर चाळीसगाव संघाचा रवींद्र कोष्टी तर बेस्ट बॅट्समन चाळीसगाव संघाचा महेश पाटील हा खेळाडू ठरला. स्पर्धेत जळगाव प्रिंट मीडिया, युट्युब मीडिया, वेब मीडिया, डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, फोटोग्राफर, संपादक, एरंडोल, अमळनेर, चोपडा, यावल, धरणगाव, मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर, चाळीसगाव, पाचोरा, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय या संघांनी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेत पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री आ.अनिल पाटील, यांनी देखील खेळण्याचा आनंद लुटला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment