पाचोरा : तात्यासाहेब आर. ओ. पाटील नगर येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. या कार्यक्रमास शाळेच्या अध्यक्षा वैशाली सूर्यवंशी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. मुख्य अतिथी व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. गणेश वंदनेच्या मंगल सुरांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.या स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी राजस्थानी, पंजाबी, हिंदी आणि मराठी गाण्यांवर मनमोहक नृत्यप्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. त्याचबरोबर, मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकत, आपल्या नृत्यातून चिमुकल्यांनी समाज प्रबोधन केले. या सादरीकरणातून त्यांनी तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे कुटुंबातील नातेसंबंध कमकुवत होत असल्याचे प्रभावीपणे दाखवून दिले.
शाळेच्या अध्यक्षा वैशाली सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि स्वयंशिस्त विकसित होते. पालकांनी आपल्या पाल्यांसोबत जास्त वेळ घालवावा, त्यांच्याशी संवाद साधावा, यामुळे मुलांना सोशल मीडियाच्या आहारी जाण्यापासून रोखता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास शाळेच्या उपाध्यक्षा कमलताई पाटील, जनसंपर्क अधिकारी आय. बी. सिंग, प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, समन्वयक स्नेहल पाटील, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील, तसेच पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख वर्षा पाटील आणि फरीदा भारमल उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. उपस्थित पालक आणि मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.