धुळे : शहरातील देवपूर भागात असलेल्या उच्चभू सोसायटीत बेकायदेशीर कुंटणखाना चालवल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईदरम्यान तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेबरोबरच दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिन्ही आरोपींना सोमवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्राथमिक तपासानुसार, आरोपी महिलेने चार महिन्यांपूर्वी हे घर भाडेतत्त्वावर घेतले होते आणि तेथे अवैधरीत्या कुंटणखाना चालवण्यास सुरुवात केली होती. या ठिकाणी महिलांना जबरदस्तीने देहविक्रीसाठी प्रवृत्त करण्यात येत होते. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी योजनाबद्ध पद्धतीने या ठिकाणी छापा टाकला.
हेही वाचा : ब्रेकअप केलं म्हणून प्रियकराचं संतापजनक कृत्य, खोटं कारण देत बोलावलं रात्री अन्…
छाप्यादरम्यान, गौरव लोटन महाजन (वय २४, रा. वरखेडी, ता. जि. धुळे) आणि सौरभ राजेंद्र देवरे (वय २४, रा. वरखेडी, ता. जि. धुळे) हे दोघे अश्लील वर्तन करताना आढळून आले. त्यांना तात्काळ ताब्यात घेतले गेले. तसेच, कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेलाही अटक करण्यात आली. पोलिसांनी या ठिकाणी असलेल्या तीन पीडित महिलांची सुटका करून त्यांना महिला सुधारगृहात पाठवले आहे.
या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता कलम १४३ (३) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम ३, ४, ५, ७, १ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयाने सोमवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईत एलसीबीचे निरीक्षक श्रीराम पवार, सहायक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक अमित माळी, पोलीस हवालदार मुकेश वाघ, शशीकांत देवरे, संदीप पाटील, पोलीस नाईक धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे, महिला पोलीस नाईक शीला सूर्यवंशी आणि राजीव गिते यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
शहरातील अवैध धंद्यांवर पोलिसांचा वचक
धुळे शहरात वाढत्या अनैतिक व्यवसायांवर पोलिसांचे लक्ष असून, अशा अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे. नागरिकांनी अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद माहिती पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.