Bhiwandi Crime News : भिवंडी शहरात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भावाचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्या २२ वर्षीय बहिणीला रात्री उशीरा खोट्या कारणाने बोलावून, निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सहा नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
शांतीनगर परिसरातील फातमा नगर येथे राहणारी २२ वर्षीय तरुणी गुरुवारी शेलार येथे आपल्या आत्या बहिणीकडे गेली होती. रात्री १२ वाजता तिला आपल्या भावाचे तब्बल १५ मिसकॉल आले होते. अचानक जाग आल्यावर तिने त्याला कॉल केला असता, त्याने “माझी तब्येत ठीक नाही, तू बागे फिरदौस येथे ये,” असे सांगितले.
भावाची प्रकृती ठीक नसल्याची कल्पना आल्याने ती आपल्या ओळखीच्या एका रिक्षाचालकासोबत बागे फिरदौस येथे पोहोचली. मात्र, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी तिच्यावर हल्ला चढवला. सदरे उर्फ मोहम्मद सईद आलम, पाशा, लड्डू, गोलू आणि अन्य दोन जण (सर्व रा. फातमा नगर) यांनी संगनमत करून तरुणी, तिचा भाऊ आणि रिक्षाचालकाला बेदम मारहाण करत अपहरण केले.
आरोपींनी तिला नागाव येथील जुनी नवजीवन इंग्रजी शाळेच्या मागे झाडा-झुडपांमध्ये नेले. तिथे त्यांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. अमानुष कृत्य करूनही नराधम थांबले नाहीत. त्यांनी तिला पुन्हा फातमा नगर येथे नेले आणि एका पिकअप बोलेरो गाडीत टाकून तिथेही अत्याचार केला.
यानंतर आरोपींनी पीडित तरुणी, तिचा भाऊ आणि रिक्षाचालकाला धमकावत सोडून पसार झाले. घाबरलेल्या तरुणीने थेट भिवंडी तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून शांतीनगर पोलिस ठाण्यात पुढील कारवाईसाठी हा गुन्हा वर्ग केला.
दोघांत प्रेमसंबंध होते, मात्र…
पोलिस तपासानुसार, पीडित तरुणी आणि मुख्य आरोपी सदरे यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, चार महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर पीडितेचे नाव दुसऱ्या तरुणासोबत जोडले गेले. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने सूड घेण्यासाठी तिच्यावर अत्याचार करण्याचे कटकारस्थान रचले.
शांतीनगर पोलिसांनी अत्याचार व अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, एक आरोपी ताब्यात घेतले आहे. उर्वरित पाच आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सक्रिय झाली आहेत.
या निर्घृण घटनेने संपूर्ण भिवंडी शहर हादरले असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून होत आहे.