---Advertisement---

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला आव्हान, आज फैसला

---Advertisement---

नाशिक : मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या अल्प उत्पन्न गटाच्या सदनिका बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्याच्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या निकालानंतर विरोधक अधिक आक्रमक झाले असून, कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, शिक्षेविरोधात आज (२४ फेब्रुवारी) माणिकराव कोकाटे सत्र न्यायालयात अपील दाखल करणार आहेत. दुपारी तीननंतर यावर सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे न्यायालयाकडून दिलासा मिळतो की अडचणीत वाढ होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर भागातील ‘निर्माण व्ह्यू अपार्टमेंट’मध्ये ३० वर्षांपूर्वी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावासह अन्य दोन व्यक्तींनी अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका मिळवल्या होत्या. तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी केली होती. गुरुवारी (२० फेब्रुवारी) नाशिक न्यायालयाने या प्रकरणात कोकाटे बंधूंना दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. आज ऑनलाइन स्वरूपात अपील दाखल केले जाणार असून, त्यानंतर सुनावणीची तारीख निश्चित केली जाईल. कोकाटे यांचे वकील अविनाश भिडे यांनी सांगितले की, “२० तारखेला न्यायालयाने जे जजमेंट दिले, त्याविरोधात आज आम्ही अपील दाखल करत आहोत. लवकर सर्क्युलेशन झाल्यास आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे. तांत्रिक मुद्दे आत्ता सांगू शकत नाही, पण निकालाविरोधात आम्ही जोरदार बाजू मांडणार आहोत.”

कोकाटे यांचा राजकीय भवितव्य धोक्यात?
या प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. जर सत्र न्यायालयातही त्यांना दिलासा मिळाला नाही, तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment