दुबई : ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत साखळी फेरीतील सामने रंगात आले असून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या दोन संघांची घोषणा झाली आहे. ग्रुप A मधून भारत आणि न्यूझीलंड यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. भारतीय संघाने आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अंतिम चारमध्ये स्थान मिळवले असून त्यांचा सेमीफायनल सामना 4 मार्च रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
4 मार्चला होणाऱ्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताची लढत ग्रुप B मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघासोबत होईल. मात्र, या क्षणी ग्रुप B मधून सेमीफायनलला कोणत्या दोन संघांची निवड होईल, हे स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा : व्याजासाठी शरीरसुखाची मागणी, दारू पाजून महिलेवर वारंवार अत्याचार!
ग्रुप B मध्ये दक्षिण आफ्रिका सध्या पहिल्या, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या आणि अफगाणिस्तान चौथ्या स्थानावर आहे. प्रत्येक संघाने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे. आगामी सामन्यांच्या निकालांवरूनच ग्रुप B मधील दुसरा क्रमांक कोणाचा असेल हे ठरणार आहे. तोच संघ 4 मार्चला भारताविरुद्ध उपांत्य लढतीस उतरणार आहे.
टीम इंडियाने रविवारी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत आपले सेमीफायनल स्थान जवळपास निश्चित केले होते. काल न्यूझीलंडने बांग्लादेशला हरवल्यानंतर भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश अधिकृतपणे निश्चित झाला. ग्रुप स्टेजमध्ये भारताने प्रभावी खेळ करत स्पर्धेत आघाडी घेतली असून, 2 मार्च रोजी होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारत पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावेल.
सेमीफायनलसाठी दुबई सज्ज!
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची क्षमता 25,000 प्रेक्षकांची असून, 4 मार्चला होणाऱ्या सेमीफायनलसाठी भारतीय चाहत्यांनी स्टेडियम भरून टाकण्याची शक्यता आहे. टीम इंडियाच्या दमदार फॉर्ममुळे क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
आता सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष ग्रुप B च्या उर्वरित सामन्यांकडे लागले आहे. कोणता संघ भारताविरुद्ध भिडणार? ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका की अफगाणिस्तान? 4 मार्चच्या सेमीफायनलसाठी अंतिम प्रतिद्वंद्वी लवकरच निश्चित होईल.