कोलकाता : कुमारतुली येथील गंगेच्या घाटावर एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा परिसर मुख्यतः दुर्गापूजेच्या मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या घटनेने स्थानिक रहिवाशांना आणि पोलिसांना हादरवून सोडले आहे.
मंगळवारी सकाळी साधारणतः 7.30 वाजण्याच्या सुमारास, कुमारतुली घाटावर नेहमीप्रमाणे योगाचा सराव करणाऱ्या काही लोकांनी, दोन महिला एका गाडीतून मोठी सुटकेस उतरवत असल्याचे पाहिले. त्या दोघींनी मोठ्या प्रयत्नांनंतरही सुटकेस हलवू शकल्या नाहीत, यामुळे उपस्थित लोकांच्या मनात शंका निर्माण झाली.
हेही वाचा : फलटणला जाण्यासाठी आली अन् घात झाला, तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
योगा करणाऱ्या लोकांनी महिलांना गाठून विचारणा केली असता, त्या टाळाटाळ करू लागल्या. त्यांना बॅग उघडण्यास सांगितले असता त्यांनी विरोध केला आणि आतमध्ये फक्त त्यांचा श्वान असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या वागण्यात काहीतरी गडबड असल्याचा संशय उपस्थितांना आला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी महिलांना चौकशीसाठी थांबवले. जेव्हा त्यांनी बॅग उघडली, तेव्हा आतमध्ये रक्ताने माखलेले कपडे आणि एका महिलेचा मृतदेह असल्याचे आढळून आले. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली. मृत महिलेची ओळख सुमिता घोष म्हणून पटली असून, ती महिलांपैकी एकीची मावशी असल्याचे समोर आले आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि प्राथमिक तपास
स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली की महिलांकडे ट्रेनचे तिकीट आढळले आहे. सुरुवातीला त्यांना काझीपाराहून कुमारतुलीला ट्रेनने आल्याचा संशय होता. मात्र, पोलिसांनी कोलकाताजवळील मध्यमग्राम येथील एक सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे, ज्यामध्ये त्या महिलांना सूटकेस एका कार्टवर टॅक्सी स्टँडकडे नेताना दिसत आहेत. त्यानंतर त्या कॅबने थेट कुमारतुली येथे आल्याचे समोर आले आहे.
महिला मध्यमग्रामच्या रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले असून, त्या गेल्या दोन वर्षांपासून भाड्याने घेतलेल्या घरात राहत होत्या. या घटनेनंतर कोलकाता पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. महिलांनी मृत महिलेची हत्या केली का, की हा केवळ आत्महत्येचा प्रकार आहे याचा शोध घेतला जात आहे. तसेच, त्यांच्या भाड्याच्या घरातील घडामोडींची सखोल चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या मते, या प्रकरणाच्या मुळाशी मोठे रहस्य दडलेले असू शकते आणि तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल.