पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवशाही बसमध्येच हा अमानुष प्रकार घडल्याने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आणि सतत वर्दळीने गजबजलेल्या स्वारगेट एसटी आगारात अशा प्रकारची घटना घडल्याने सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून, फरार झालेल्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत.
स्वारगेट पोलीस ठाण्याच्या महिला अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यात नोकरी करत होती. घटनेच्या दिवशी ती फलटणला आपल्या गावी जाण्यासाठी सकाळी 5:30 ते 5:45 दरम्यान स्वारगेट एसटी डेपोत आली होती. त्याचवेळी आरोपी दत्तात्रय गाडे हा परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
हेही वाचा : फलटणला जाण्यासाठी आली अन् घात झाला, तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
तरुणी बस स्थानकात एका बाकावर बसलेली असताना तिच्या शेजारी एक व्यक्ती होता. मात्र, आरोपी जवळ आल्यावर तो व्यक्ती निघून गेला. यानंतर आरोपीने पीडितेच्या गावी जाण्याविषयी चौकशी करत तिला गोड बोलून विश्वासात घेतले. त्याने सांगितले की, सातारची बस दुसऱ्या ठिकाणी उभी आहे आणि तो तिला त्या दिशेने घेऊन जाईल.
आरोपीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तरुणी त्याच्या मागे गेली. ती बसपर्यंत पोहोचली तेव्हा तेथे अंधार होता. त्यामुळे ती संभ्रमात पडली. यावेळी आरोपीने तिला सांगितले की, रात्रीची बस असल्यामुळे दिवे बंद आहेत आणि लोक झोपले आहेत. त्याने तिला आत जाऊन टॉर्चने तपासण्यास सांगितले.
हेही वाचा : गंगेच्या घाटावर सुटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, दोन महिलांना अटक
तरुणी बसमध्ये चढताच आरोपीने लगेच तिच्या मागोमाग जाऊन बसचा दरवाजा बंद केला आणि तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. धक्क्यात गेलेल्या तरुणीने नंतर दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी जाण्यास सुरुवात केली. मात्र, तिने वाटेतच आपल्या मित्राला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. मित्राच्या सल्ल्यानंतर ती थेट स्वारगेट पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी त्वरीत स्वारगेट एसटी डेपोचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये आरोपी दत्तात्रय गाडे स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, तो पुणे ग्रामीण हद्दीतील शिरूर तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजले. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी आठ विशेष पथके तयार केली आहेत. त्याचबरोबर डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपास सुरू असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
स्वारगेट एसटी आगारात नेहमीच मोठी गर्दी असते. अशा ठिकाणी एका तरुणीवर अत्याचार होणे, तसेच बसमध्येच हा प्रकार घडणे, ही बाब अत्यंत गंभीर असून एसटी महामंडळाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिक आणि महिला प्रवाशांनी त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी नागरिकांना आश्वासन दिले आहे की, आरोपीला लवकरच अटक करून कठोर कारवाई केली जाईल. तसेच स्वारगेट एसटी आगार आणि इतर प्रमुख बस स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.