---Advertisement---

भारताच्या निलम शिंदेची अमेरिकेत मृत्यूशी झुंज, पालकांना मुलीच्या भेटीसाठी व्हिसाची प्रतीक्षा

---Advertisement---

कराड : तालुक्यातील उंब्रज गावातील 35 वर्षीय निलम शिंदे अमेरिकेत मृत्यूशी झुंज देत आहे. 14 फेब्रुवारी रोजी व्यायामासाठी जात असताना तिला एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, हात-पाय आणि छातीत मार बसल्याने ती कोमात आहे. सध्या तिच्यावर अमेरिकेत आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

अपघाताच्या घटनेनंतर निलमच्या पालकांनी तातडीने अमेरिकेला जाण्यासाठी वैद्यकीय आणीबाणीच्या व्हिसासाठी अर्ज केला. मात्र, त्यांना अद्याप व्हिसा मिळालेला नाही. या संदर्भात निलमच्या कुटुंबीयांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला. तसेच मुंबईतील कुर्ला पासपोर्ट आणि व्हिसा कार्यालयात जाऊन अर्ज सादर केला, पण तिथेही कोणतीही मदत मिळाली नाही.

हेही वाचा : अनैतिक संबंध : नवऱ्याचा काटा काढण्याचं ठरवलं अन् प्रियकरालाही गमावून बसली महिला, नेमकं काय घडलं?

निलमला धडक देणाऱ्या वाहनचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, स्थानिक पोलिसांनी असे सांगितले आहे की, तिच्या रक्ताच्या नातेवाईकांच्या अनुपस्थितीत अधिकृत गुन्हा नोंदवता येणार नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांची उपस्थिती अत्यावश्यक आहे.

निलमच्या कुटुंबियांनी आणि तिच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांमार्फत केंद्र सरकारपर्यंत हा विषय पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याची दखल घेत अमेरिकन सरकारकडे तिच्या वडिलांसाठी तातडीने व्हिसा मंजूर करण्याची विनंती केली आहे.

निलमचे वडील तानाजी शिंदे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला मदतीची विनंती केली आहे. “16 फेब्रुवारीपासून आम्ही व्हिसासाठी प्रयत्न करत आहोत, पण अद्याप काहीच प्रतिसाद मिळालेला नाही,” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर व्हिसा मिळावा, जेणेकरून ते अमेरिकेत जाऊन निलमच्या उपचारांसाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू शकतील.

ही परिस्थिती पाहता, निलमच्या पालकांना तातडीने व्हिसा मिळवून देण्यासाठी सरकारने आणखी जलद पावले उचलण्याची गरज आहे. या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून, निलमच्या प्राणांसाठी सुरू असलेली ही लढाई आणि तिच्या कुटुंबाची व्यथा सरकारपर्यंत पोहोचवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment