जळगाव : नि:पक्ष, वस्तुनिष्ठ व पारदर्शी पत्रकारिता हा लोकशाहीचा गाभा असून विकास पत्रकारितेद्वारा सरकारी योजना जनतेपर्यत पोहचविण्याचे काम पूर्वकाळापासून प्रसारमाध्यमांनी केले आहे. असे प्रतिपादन कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळा, विभागीय अधिस्वीकृती समिती,नाशिक व जिल्हा माहिती कार्यालय,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेत “विकास पत्रकारिता : काल, आज, उद्या” या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू प्रा.माहेश्वरी बोलत होते. यावेळी मंचावर नाशिक येथील विभागीय माहिती उपसंचालक डॉ.किरण मोघे, अहिल्यानगर येथील विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष सुधीर लंके, जळगाव येथील जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर व जिल्हाधिकारी कार्यालयाचे मिलिंद बुवा हे उपस्थित होते.
प्रा.माहेश्वरी पुढे म्हणाले की पूर्वीच्याकाळी लोकांपर्यंत माहिती पोहचविण्याचे काम वर्तमानपत्रे, रेडीओ, टीव्ही ही साधने करीत होती. आता तंत्रज्ञानात झालेला बदल व सोशल मिडीया या सारखी संसाधने वाढल्याने सरकारच्या योजना सर्वसाधारण जनतेपर्यंत सहज पोहचल्या जात आहेत. प्रसार माध्यमांद्वारे विकास पत्रकारितेचे काम चांगल्या पध्दतीने होत आहे. प्रारंभी प्रा.डॉ.सुधीर भटकर यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेच्या आयोजना मागील भूमीका सांगितली. उद्घाटनसत्राचे सुत्रसंचालन डॉ.गोपी सोरडे यांनी केले तर आभार डॉ.सोमनाथ वडनेरे यांनी मानले.
उद्घाटनसत्रानंतर श्री.मिलिंद बुवा यांनी “प्रशासनात एआय चा वापर ” या विषयावर सविस्तर माहिती आपल्या व्याख्यानातून दिली. विभागीय उपसंचालक डॉ.किरण मोघे यांनी “पत्रकारांसाठीच्या विविध विकास योजना” या विषयावर माहिती दिली. अधिस्वीकृती पत्रिका-निकष आणि प्रक्रिया या संदर्भात विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुधीर लंके यांनी विवेचन केले. पुढील सत्रात जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी “शासकिय योजना आणि विकास पत्रकारिता” यावर भाष्य केले. त्यानंतर जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी “विकास पत्रकारितेतील स्थित्यंतर” या विषयावर विवेचन केले. समारोप प्रसंगी प्रा.डॉ. सुधीर भटकर यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील हे 31मार्च रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा यावेळी कुलगुरू प्रा.माहेश्वरी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार शिवलाल बारी यांनी कुलगुरुंची तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्कार केला.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी ॲड.सूर्यकांत देशमुख,मंगेश बाविसाने, सौ.रंजना चौधरी,धनंजय देशमुख, भिकन बनसोडे यांनी परिश्रम घेतले.
नि:पक्ष, वस्तुनिष्ठ व पारदर्शी पत्रकारिता हा लोकशाहीचा गाभा – कुलगुरू प्रा.व्ही. एल माहेश्वरी
Published On: मार्च 24, 2025 7:14 pm

---Advertisement---