भुसावळ : तालुक्यातील वरणगाव शहरातील सम्राट नगरातील रहिवासी तथा भारतीय सेना दलातील जवान अर्जुन लक्ष्मण बावस्कर (३५) यांना अरुणाचल प्रदेशात देशसेवा बजावताना वीर मरण आले. सोमवार, २४ रोजी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वीर जवानाचे पार्थिव सेना दलाच्या विशेष विमानाने छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे बुधवारी (२६ मार्च) रात्रीपर्यंत पोहोचणार असून तेथून ते वरणगाव येथे आणल्यानंतर गुरुवारी (२७ मार्च) रोजी वीर जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
अरुणाचल प्रदेशात २४ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अर्जुन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यांना वीर मरण आले. सोबतच्या जवानांनी दवाखान्यात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. वरणगावातील बाविस्कर परिवाराला जवानाच्या वीर मरणाची वार्ता कळताच मोठा मानसिक धक्का बसला.
दोन महिन्यांपूर्वीच सुटीवर अर्जुन हे वरणगावी येऊन गेले. २०१० मध्ये ते मध्य प्रदेशातून सेनेत भरती झाले व गेल्या १५ वर्षांत त्यांनी देशभरात विविध ठिकाणी सेवा बजावली. अर्जुन यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात झाले आहे. सेवानिवृतीला अवघी दोन वर्षे बाकी असताना त्यांना वीर मरण आले.
गुरुवारी शासकीय इतमातात त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार होतील. वीर जवानाच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील व भाऊ, बहीण असा परिवार आहे. अर्जुन यांचे वडील रेल्वेतून चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सेवानिवृत झाले आहेत, तर भाऊ दीपनगरात कार्यरत आहे.