गुवाहाटी : सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर, गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आज, बुधवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकतील. या सामन्यात ते त्यांच्यातील उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करतील. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात नाईट रायडर्सना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सात गड्यांनी पराभव पत्करावा लागला, तर राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्स हैदराबादने ४४ धावांनी पराभव केला. या दोन्ही सामन्यांमध्ये नाईट रायडर्स आणि राजस्थान हे संघ फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात आक्रमकता दाखवण्यात अपयशी ठरले होते. सुनील नारायण वगळता नाईट रायडर्सचा कोणताही गोलंदाज आरसीबीच्या फलंदाजांना थोपवू शकला नव्हता. या सामन्यापूर्वी चांगल्या फॉर्ममध्ये असलेला फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती प्रभाव पाडू न शकणे ही चिंतेची बाब असेल. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर चक्रवर्तीविरुद्ध फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी सहज धावा गोळा केल्या. वरुण गुवाहाटीमध्ये चांगली कामगिरी करेल, अशी नाईट रायडर्सला आशा आहे.
नाईट रायडर्सचे पाठीच्या दुखापतीतून सावरत असलेल्या अँरिक नोर्कियाच्या तंदुरुस्तीवरही लक्ष ठेवतील. जर दक्षिण आफ्रिकेचा हा वेगवान गोलंदाज तंदुरुस्त घोषित झाला तर त्याला स्पेन्सर जॉन्सनच्या जागी अंतिम अकरा संघात समाविष्ट केले जाऊ शकते. गेल्या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणे आणि नारायण बाद झाल्यानंतर नाईट रायडर्सचा मधला क्रम कोसळला. वेंकटेश अय्यर आणि आंद्रे रसेल चुकीचे फटके खेळत बाद झाले.
याशिवाय, नाईट रायडर्सना रिंकू सिंगकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. या आक्रमक फलंदाजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या पाच डावांमध्ये फक्त ११, ९, ८, ३०, ९ धावा केल्या. आयपीएलच्या पहिल्या सामन्यातही तो फक्त १२ धावा करू शकला. दुसरीकडे राजस्थानला पुनरागमन करायचे असेल तर त्यांच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. सनरायझर्सविरुद्धच्या मागील सामन्यात, त्यांचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने चार षटकांत ७६ धावा दिल्या तर फजल हक फारुकी आणि महेश थिकशाना देखील फलंदाजांना रोखण्यात अपयशी ठरले. त्या सर्वांना गुवाहाटीला परतण्याची संधी मिळेल. राजस्थानचा प्रभारी कर्णधार रियान परागचीही येथे कसोटी लागणार आहे.