रावेर : शेतातील जमीन मोजमापाच्या खुणा दाखवण्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. राजेंद्र रमेश कुलकर्णी (वय ४८) असे लाचखोर भूकरमापकाचे नाव आहे. रावेरच्या भूमी अभिलेख कार्यालयात ही कारवाई करण्यात आली असून, या कारवाईमुळे एकच खळबळ उडालीय.
तालुक्यातील मस्कावद येथे तक्रारदार यांची शेतजमीन असून, त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात 7 जानेवारी 2025 रोजी मोजणीसाठी अर्ज केला होता. यासाठी आवश्यक शासकीय शुल्कदेखील त्यांनी भरले. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2025 रोजी भूकरमापक राजेंद्र कुलकर्णी याने शेतात येऊन मोजणी केली.
हेही वाचा : ‘घरी ये, कोणी नाहीय…’, सख्ख्या बहिणींनी व्यापाऱ्याला बोलावलं अन्; वाचा नेमकं काय घडलं?
मात्र, मोजमापाच्या खुणा दाखवण्यासाठी भूकरमापक राजेंद्र कुलकर्णीने ५,५०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर, कुलकर्णी याने लाच हरभऱ्याच्या स्वरूपात देण्यासही सांगितले. यामुळे तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीनंतर एसीबीने 25 मार्च रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. या वेळी भूकरमापक राजेंद्र कुलकर्णी यांनी प्रथम ५५००, नंतर ५००० आणि अखेर ४००० रुपये लाचेची रक्कम निश्चित केली. २६ मार्च रोजी निंभोरा येथे एका शेताजवळ तक्रारदाराकडून ४,००० रुपये स्वीकारताना भूकरमापक राजेंद्र कुलकर्णीला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी लाचखोर भूकरमापकाविरुद्ध निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.