जळगाव : जिल्ह्यात 2024 च्या मान्सून काळात सरासरीपेक्षा दीडपट पर्जन्यमान झाले होते. यामुळे जिल्ह्यातील लहान-मोठे बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहिले. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत नदी-नाल्यांमध्ये जलप्रवाह सुरू होता. परंतु आवर्तनातून पाण्याचा वारेमाप वापर आणि उष्ण वातावरणामुळे बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणामुळे वाढला. यात गिरणाचा 33, तर हतनूरचा उपयुक्त जलसाठा 60 टक्क्यांवर आला आहे. तसेच जिल्ह्यातील अन्य लहान-मोठ्या 96 प्रकल्पांमधील उपयुक्त जलसाठा सरासरी 46.87 टक्के असून अजून साडेतीन ते चार महिने शिल्लक जलसाठा पुरविण्याचे आव्हान स्थानिक प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.
जिल्ह्यात मान्सून दरम्यान सरासरी दीडपट पावसामुळे सर्वच लहानमोठे प्रकल्प तुडुंब भरून बऱ्यापैकी प्रवाहित होते. जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, तसेच पाच ते सहा तालुक्यांसह 130 च्यावर ग्रामीण पाणीपुरवठा योजना आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिका, नांदगाव नगरपालिका, ग्रामीण पाणीपुरवठा योजना गिरणा प्रकल्पावर अवलंबून आहेत.

गिरणा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत प्रकल्पातून तीन सिंचनाची आणि चार पेयजलाची अशी सात आवर्तने देण्याचे निश्चित झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत सिंचन आणि पेयजल मिळून तीन आवर्तने देण्यात आली आहेत. सद्य:स्थितीत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच गिरणा प्रकल्पात 33.81 टक्के उपयुक्त जलसाठा असून आता फक्त पेयजलासाठी चार आवर्तने शिल्लक आहेत.
मे महिनाअखेरीस बागायती कपाशी लागवडीसाठी पाणी सोडण्याची ओरड होईल. परंतु मे महिन्याअखेर उर्वरित साठ्यामधून सिंचन वा कपाशी लागवडीसाठी आवर्तन सोडल्यास पेयजलाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे हतनूर प्रकल्पातूनदेखील आतापर्यंत तीन आवर्तने सोडण्यात आली असून सद्य:स्थितीत 60.59 टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. गिरणा प्रकल्पाच्या मानाने हतनूर प्रकल्पात दुप्पट जलसाठा शिल्लक असून पाडळसे आणि शेळगाव बंधाऱ्यातदेखील जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पूर्व भागात सिंचन आणि पेयजल साठ्याची कमतरता भासणार नाही.
जिल्ह्यात तीन मोठ्या प्रकल्पांपैकी गिरणा प्रकल्पातून सांडव्यावरून 600 तर डाव्या कालव्याद्वारे 100 असे 700 क्यूसेकचे आवर्तन देण्यात येत असून 33.89 टक्के, हतनूर प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून 100 क्यूसेकनुसार आवर्तन असून 60.59 टक्के तर वाघूर 80.73 नुसार सरासरी 51.81 टक्के जलसाठा आहे. तसेच मध्यम आणि लघु प्रकल्पांपैकी भोकरबारी 5.93, बोरी 18.63, शेळगाव बॅरेज 22.94, हिवरा 27.90, अंजनी 37.87, मन्याड 43.98, तोंडापूर 42.37, बहुळा 41.29, मंगरूळ 53.19, गूळ 70.59, अभोरा 76.32, मोर 72.89, सुकी 82.85 असा सरासरी 30.37 टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी हतनूर 65.10, गिरणा 31.56, वाघूर 74.38 तर लघु मध्यम प्रकल्पांपैकी मन्याड, भोकरबारी, प्रकल्पात ठणठणाट होता. आणि अन्य प्रकल्पात सरासरी 40.62 टक्के म्हणजे निम्मेपेक्षा जेमतेम साठा होता.
गिरणाचा पाणीसाठा टिकविण्याचे आव्हान
गिरणा प्रकल्पात 100 टक्के उपयुक्त जलसाठ्यापैकी डिसेंबर ते जानेवारी दरम्यान पहिल्या आणि फेब्रुवारी ते मार्च महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील आवर्तन सोडण्यात आले. यात सरासरी 50 टक्के सिंचनासह पेयजलासाठी वापर झाला आहे. तर सरासरी 14 ते 17 टक्के बाष्पीभवन आणि बऱ्याचशा ठिकाणी कालवा पाटचारीतून थेट पंपाद्वारे पाणीचोरी वा पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर झाला असण्याची शक्यता आहे.
गिरणा प्रकल्पात आजमितीस सरासरी 33 टक्के उपयुक्त जलसाठा आहे. अजून पेयजलासाठी तीन आवर्तने शिल्लक असून किमान साडेतीन ते चार महिने उपयुक्त जलसाठा पुरवावा लागणार आहे. त्या दृष्टीने सर्व पाणीवापर करणाऱ्या संस्थांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा . पाणीवापर संस्था, स्थानिक नगरपालिका, ग्रामपंचायती आणि शेतकऱ्यांनी पाणीपट्टी देयके वेळेवर भरणा करावीत, असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येत आहे.
देवेंद्र अग्रवाल,
-कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.