सोयगाव : गाव व परिसरात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास वादळी वाऱ्यासह किरकोळ अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे बुधवारी पहाटेपासून शेतकऱ्यांची धांदल उडाली होती अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने रब्बीची कापणीवर आलेली पिके व उन्हाळी पिकांची नुकसान झाले आहे.
आंबा, उन्हाळी ज्वारी, मका आडव्या झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परिसरात मंगळवारी रात्री वादळी वारा व किरकोळ अवकाळीच्या हलक्या स्वरूपात सरी कोसळल्या. बुधवारीही परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रविवारपासून ते बुधवारपर्यंत सलग चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे.

पिंपळनेरसह परिसरातील अनेक गावांत अवकाळी पावसाचा फटका
पिंपळनेर : शहरासह परिसरातील गावांत बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी चिकसे, सामोडे, देशशिरवाडे, बल्हाणे, दहिवेल, चिंचपाडा व बोधगाव आदी गावांत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चिकसे, सामोडे, देशशिरवाडे, बल्हाणे व इतर गावांत बुधवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही गावात मुसळधार पाऊस तर काही गावांमध्ये गारपीठ झाली आहे. दहिवेल,चिंचपाडा,बोधगावमध्ये गारपीठ,अवकाळी पाऊस व वेगवान वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मका ,कांदा,गहू यांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.