Nanded accident news : नांदेड : राज्यात हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह थैमान घातला असून, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच नांदेडात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नांदेड जिल्हयात झालेल्या अवकाळी पावसामुळे टायर स्लीप होऊल ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला. या अपघातात तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलीस सूत्रानुसार, हिंगोली जिल्ह्यातील गुंज गावातील शेतमजूर महिला भुईमूग काढणीसाठी नांदेडमधील आलेगावात ट्रॅक्टरने जात होत्या. दरम्यान, सकाळी ७ वाजेच्या सुमारास आलेगावातील एका विहिरीत टायर स्लीप होऊन ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला. या अपघातात ट्रॅक्टरसह सर्व मजूर महिला पाण्यात बुडाल्यामुळे तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, यातील दोन महिलांना पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं. मात्र ट्रॅक्टर ट्रॉली आणि काही महिला या विहिरीतच असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेनंतर परिसरात खळबळ
या अपघातात १० ते १२ मजूर महिला असल्याचे सांगण्यात येत असून, यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.