---Advertisement---

Heat wave : नागरिकांनो, काळजी घ्या! सूर्य ओकतोय आग, भुसावळचा पारा @45

---Advertisement---

Bhusawal Temperature News : गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे एक-दोन दिवस तुरळक स्वरूपात बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे दमटपणा वाढून तळपत्या उन्हापासून जळगाव जिल्हावासियांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, दोन दिवसांपासून पुन्हा जिल्हा तापला (Jalgaon Temperature News) असून, पारा पाच ते सहा अंशाने वाढून तापमान ४५ अंशांवर जाऊन पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यात सद्यःस्थितीत राजस्थान, मध्य प्रदेश या पश्चिमोत्तर भागातून उष्ण वारे वाहत असून, कोरड्या वातावरणामुळे तळपत्या उन्हाच्या झळा अधिकच जाणवत आहेत. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण आता कमी झाले असून, उष्ण लहरींमुळे तापमानाचा पारा दिवसागणिक चढता राहिला आहे. रविवारी (६ एप्रिल) ४० अंशांपर्यंत आणि २ अंशांनी वाढ होऊन सोमवारी (७ एप्रिल) ४२.५ अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली. त्यानंतर काल मंगळवारी भुसावळच्या हतनूर धरण तापमान केंद्रावर दुपारी ३ वाजता ४५ अंश डिग्री सेल्सिअस इतक्या उच्च तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

आगामी आठवड्यात वातावरण संमिश्र राहण्याचा अंदाज

आगामी दोन आठवडे तरी जिल्ह्यात ढगाळ व उष्ण असे संमिश्र हवामान कायम राहणार आहे. त्यामुळे तापमानाचा पारा ४५ अंशांवर जाण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तापमानापासून काहीअंशी दिलासा मिळू शकतो. मात्र, तोही केवळ दोन ते तीन दिवसांसाठी असू शकतो. आगामी आठवडाभरात तापमान पाहता, ते चढे आणि पुन्हा ढगाळ वातावरणामुळे संमिश्र स्थिती राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, यावर्षी हिवाळा म्हणावा तसा जाणवलाच नाही. उन्हाळ्याची सरुवात फेब्रुवारीपासूनच जाणवत होती. मार्चच्या सुरुवातीपासून पारा ३५ ते ३८ अंशांदरम्यान राहिला. एप्रिलमध्ये सुरुवातीचे काही दिवस ढगाळ वातावरणामुळे तापमान काहीसे कमी होते. मात्र, दोन दिवसांपासून तापमान पुन्हा वाढत असून, येत्या दोन तीन दिवसांत पुन्हा ४३ अंशांवर तापमान राहणार असून, पुन्हा ढगाळ वातावरणाचा अंमल राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment