जळगाव : येत्या आठवड्यात केवळ चार दिवस बँकेचे कामकाज चालणार आहे. राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांना दोन सुट्या येत असल्याने केवळ चार दिवसच त्यांचे कामकाज चालणार आहे. दरम्यान, ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील एटीएममध्ये सुटीचे दिवस लक्षात घेऊन आधीच रक्कम भरली जाते. या ठिकाणी रोख रक्कम काढता येते, तसेच भरताही येते. दोन्ही सुविधांचे मशिन्स उपलब्ध असल्याची माहिती उपशाखा व्यवस्थापक सुमित ओक यांनी दिली.
बँकांना येत्या आठवड्यात अर्थात सोमवारी (दि. १४), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुटी आहे. त्यानंतर दि. १५ ते १७ दरम्यान त्यांचे कामकाज होणार आहे. शुक्रवारी (दि. १८), गुडफ्रायडेची सुटी असणार आहे, तर शनिवारी मात्र तिसरा असल्याने त्या दिवशी बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. मात्र, रविवार व सोमवार, अशी सलग दोन दिवसांची सुटी येत असल्याने एटीएममध्ये रोकड खुंटण्याची शक्यता काही ग्राहकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, बँकांना सलग सुट्या असल्यास ग्राहकांचा भर हा एटीएममधून पैसे काढण्यावर असतो. त्यामुळे पुढील आठवड्यात एटीएममध्ये पुरेशी रोकड राहील यादृष्टीने बँकांनी नियोजन करावे, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे.
… पण सलग सुट्या आलेल्या नाहीत
एप्रिल महिन्याच्या पहिल्या १२ दिवसांत दुसरा शनिवार, रविवार यासह महावीर जयंती अशी एकूण तीन दिवस सुटी होती. त्यामुळे बँकांचे कामकाज नऊ दिवसच झाले होते. मात्र, या सुट्या सलग नव्हत्या, तर दि. १४ ते ३० एप्रिल दरम्यान, सुट्यांचे दिवस वगळता १२ दिवसच बँका सुरू राहणार आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ग्राहकांची सर्वाधिक गर्दी दर महिन्याच्या पहिल्या १० ते १२ दिवसांत होत असते.